संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्यातही दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे दररोज महिलांना टार्गेट करुन दागिने चोरत आहेत. पुणे शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, आंबेगाव, कात्रज आणि वारजे माळवाडी परिसरात पादचारी महिलांकडील दीड लाखांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार या कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरातील इंद्रायणी इंटरनॅशनल स्कुल समोरून पायी चालत जात होत्या, त्यांच्या गळ्यातील आठ हजरांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर अधिक तपास करत आहेत.
कात्रज भागातील वरखेडेनगर परिसरात बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ५० वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.
वारजे परिसरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ५५ वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील ४२ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावू नेले. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा करत आहेत.
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ
सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पै-पै जमवणाऱ्या पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत ‘करोडपती’ होत आहेत. पुणेकर कंगाल होत असताना पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे. वाहन चोरी, सोनसाखळी, लुटमार आणि घरफोडी अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सर्व सामान्य पुणेकर हैराण आहेत. काही वेळांसाठीही घर बंद केल्यानंतर कायम तुमच्यावरच नजर ठेवल्याप्रमाणे ते घर फोडले जात आहे. रात्री आणि दिवसा देखील घरफोडीच्या घटना घडत असल्याने पुणेकरांनी घराला कुलूप लावायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.