
पक्ष, चिन्हावर सलग २ दिवस सुप्रीम सुनावणी
नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. या सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. मात्र, आता याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सलग दोन दिवस होणाऱ्या या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे अधिकृत नाव शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर पार पडणार आहे. प्रत्येक गटाला ३ तास युक्तिवाद करण्याची संधी मिळणार आहे.
हेदेखील वाचा : ‘आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल’; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र, आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह यावर निकाल दिला जाणार आहे.
घडाळ्याचे भविष्य ठरणार
शिवसेनेवरील सुनावणीनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि ‘घड्याळ’ चिन्हावरील वादाचीही सुनावणी होईल. कारण दोन्ही प्रकरणांत काही समान मुद्दे आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर शरद पवारांच्या गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीची शिवसेनेकडून तयारी
महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ मानसन्मान राखला तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला” उबाठाच्या दुटप्पीपणावर उदय सामंत यांची सडकून टीका