
शरद पवार अन् अजित पवार एकत्रित लढणार
दोन्ही पक्षांची बारामतीमध्ये पार पडली बैठक
बारामतीमध्ये कृषी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
बारामती: महापालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवली, त्याप्रमाणे होणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक देखील एकत्र लढवली जाईल, या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रमुख नेत्यांची बैठक गोविंदबाग निवासस्थानी. पार पडली असून, या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बारामती कृषी विज्ञान केंद्रातील आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी गोविंद बाग या शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जयंत पाटील, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील,राजेश टोपे या नेत्यांची बैठक संपन्न झाली. महापालिका निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अचानक हे सर्व नेते गोविंद बागेत एकत्र आल्याने, माध्यमांमध्ये खळबळ उडाली. या बैठकीनंतर शशिकांत शिंदे गोविंद बागेबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता
ही बैठक केवळ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी पार पडले असल्याचे सांगत शशिकांत शिंदे म्हणाले, महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले, त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. राज्यातील १२ ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढणार आहेत. काही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढणार आहोत. ग्रामीण भागात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, या पार्श्वभूमीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहोत.
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप
महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठे अपयश आले असल्याच्या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले, आताच्या निवडणुका झालेल्या विकासावर न होता, धार्मिक वादावर आणि आर्थिक वाटपावर वाटपावर होत असल्याचे चित्र आहे, सत्तेचा गैरवापर देखील या निवडणुकीमध्ये होत आहे, हे दुर्दैवी आहे, त्यातूनच या निकालावर परिणाम झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. आजच्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कोणताही निर्णय अथवा चर्चा झाली नसल्याचे सांगत या बैठकीत केवळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतच चर्चा झाल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.