
अकोला महानगरपालिका क्षेत्रात सकाळपासून ते आता दुपारपर्यंत मतदान संथगतीने सुरु असून पहिल्या दोन तासात 6.48 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये गोंधळ असून मतदार यादीत नावांची शोधाशोध करताना मतदारांची तारेवर कसरत झाली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूकीच्या आधीच अकोला मनपा क्षेत्रात 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे मतदान केंद्र संवेदनशील होत आहे.
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये मतदान प्रक्रियेला सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी 6.48 टक्के आहे. महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये पुरुष मतदार संख्या दोन लाख 74 हजार 877 व महिला मतदारांची संख्या दोन लाख 75 हजार 142 व इतर 41 असे एकूण पाच लाख 50 हजारच्या आसपास मतदार आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार मनपा निवडणुकीसाठी संवेदनशील असणारे एकूण 67 मतदान इमारती आहेत. खबरदारी म्हणून ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘वेबकास्टिंग’ करण्यात येत आहे, असे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले. मात्र मतदार केंद्रावर झालेल्या या गोंधळामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.