AMC Election 2026
प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.
हे देखील वाचा : प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड
प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथके पाठवून दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्रांवर तांत्रिक . मात्र, या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे मतदानाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. “यंत्रे बंद पडणे ही तांत्रिक बाब आहे,” असे स्पष्टीकरण देत अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात मतदारांचा संताप लपून राहिला नाही.
या घटनेचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटले. विरोधी पक्षांनी प्रशासनाच्या तयारीवर गंभीर आरोप करत, “संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या माहिती असतानाही पुरेशी बॅकअप यंत्रणा का नव्हती?” असा सवाल उपस्थित केला. काही नेत्यांनी याला ‘प्रशासनाचा गलथान कारभार’ ठरवत निवडणूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले. सोशल मीडियावरही यंत्र बंद पडल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार मिळाली.
हे देखील वाचा : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?
विशेष म्हणजे, शहरातील इतर भागांतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, एकूणच निवडणूक व्यवस्थापनातील तांत्रिक तयारीवर प्रश्न निर्माण झाला आहे. मतदान हा लोकशाहीचा कणा असताना, अशा अडचणींमुळे मतदारांचा उत्साह मावळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाने सर्व यंत्रांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले असून, उर्वरित वेळेत मतदान सुरळीत पार पडेल, असा दावा केला आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच अशा त्रुटी समोर येणे हे प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निवडणुकीनंतर या प्रकारांची सखोल चौकशी होणार का, आणि जबाबदारी निश्चित होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






