CSMC Election 2026: संभाजीनगरात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार! भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत
अतुल सावे यांच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत आढळल्याने आता अनेक शंका निर्माण होत आहेत. तसेच आयोगाच्या कामावर प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावरून पुन्हा राजकारण तापणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप नेते अतुल सावे यांचे वडील व माजी शिवसेना नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाले. तरी देखील अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोरेश्वर सावे यांच्या निधनाला तब्बल 10 वर्ष उलटल्यानंतरही त्यांचे नाव मतदार यादीत कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणी तपास करण्याची विनंती आता केली जात आहे. या प्रकरणामुळे आता निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)
छत्रपती संभाजी नगर येथील गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान सुरु असतानाच ईव्हीएम मशीन बंद पडले, त्यामुळे तासभर मतदारांना रांगेत थांबावे लागले होते. 1 तास मशीन सुरु न झाल्याने मतदारांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. एकीकडे भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत आढळले तर दुसरीकडे सुमारे तासभर ईव्हीएम मशीन बंद होते. त्यामुळे संभाजीनगरात मतदानादरम्यान निवडणूक आयोगाच्या नियोजनावर शंका उपस्थित केली जात आहे.
आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र मतदानावेळी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कधी मतदार यादीतून नाव गायब होत आहे तर कधी ईव्हीएम मशीन बंद होते. ही परिस्थिती कोणत्याही एका शहरात नाही. तर छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी मतदार वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत आहेत.






