
'बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा...' शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
राजू भोईर यांनी यासंदर्भात महापौरांना पत्र पाठवून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ कलादालनाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असल्यामुळे राजकीय आकसातून ते सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर भाजप किंवा महापालिका प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या कलादालनाचे लोकार्पण झाले होते. विज्ञान केंद्र, बालविभाग, सभागृह, प्रदर्शन दालने, वाचनालय आणि उपाहारगृह अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, लोकार्पणानंतरही कलादालनाचे दरवाजे नागरिकांसाठी बंदच आहेत.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, कलादालनाची सुरक्षा, स्वच्छता, कर्मचारी, तिकीट व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, सीसीटीव्ही आणि उद्वाहक यांच्या देखभालीसाठी दरमहा सुमारे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे, इमारत अद्याप कंत्राटदाराकडून महापालिकेच्या ताब्यात आलेली नसल्याचे आणि कलादालन चालविण्याचे धोरणही निश्चित झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
राजू भोईर यांनी पत्रात म्हटले आहे की, या कलादालनासाठी राज्य शासनाच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे केंद्र सुरू झाल्यास विद्यार्थी, लहान मुले, कलाप्रेमी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकतो. मात्र, वर्षभराहून अधिक काळ उलटूनही कलादालन बंद असल्याने नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
गेल्या दिवाळीत कलादालन सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा करत भोईर यांनी दुसरी दिवाळी तोंडावर आली तरी कलादालन बंद असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. येत्या १ नोव्हेंबरपर्यंत कलादालन पूर्ण क्षमतेने नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत हे कलादालन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ किंवा अन्य सक्षम संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. देखभाल आणि संचालनासाठी होणारा खर्च लक्षात घेता हा पर्याय पुढे आणण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनीही या प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. आता कलादालनाच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव आणि शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांसाठी उभारलेली वास्तू अद्याप बंद का, तिच्या संचालनाचे धोरण वेळेत का ठरले नाही आणि हस्तांतरणाचा निर्णय नेमका कोणत्या निकषांवर घेतला जात आहे, या प्रश्नांची उत्तरे आता महापालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.