
मुंबई महानगरपालिकेत नवा ट्विस्ट! 'उबाठा' नेत्याचेच शिंदे गटाला साकडं (Photo Credit- X)
नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. अशाप्रकारे महायुतीकडे एकूण ११८ जागांचे संख्याबळ आहे, जे ११४ या बहुमताच्या आकड्यापेक्षा ४ ने जास्त आहे. तांत्रिकदृष्ट्या महायुतीचा महापौर बसणे सोपे दिसत असले तरी, महापौरपदावर दावा कोणाचा? यावरून रस्सीखेच सुरू आहे.
भास्कर जाधव यांनी या राजकीय पेचप्रसंगात ‘बाळासाहेब ठाकरे’ कार्ड खेळले आहे. पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, “हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अशा वेळी सर्व मान-अपमान आणि वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.” भास्कर जाधव यांनी पुढे स्पष्ट केले की, मुंबईचा महापौर शिवसेनेचा नसावा याचे त्यांना वैयक्तिक दुःख आहे. जे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार समजतात, त्यांनी ही संधी गमावू नये.
एकनाथ शिंदे सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत, याची जाणीव करून देत जाधव म्हणाले, “मी शिंदेंना विनंती करतो की, त्यांनी भाजपला सांगावे की आम्ही केंद्रात आणि राज्यात तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आम्ही तुमच्यासोबतच आहोत. परंतु, हे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे ज्या कोणा महिला उमेदवाराला उभे करतील, तिला निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मोठे मन दाखवून मदत करावी.”
आरक्षण सोडतीमुळे आता बीएमसीला महिला महापौर मिळणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याने त्यांचा दावा प्रबळ आहे, मात्र भास्कर जाधव यांच्या आवाहनामुळे शिंदे गटातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “शिवसेनेचा झेंडा मुंबईत फडकवावा” ही भावनिक साद शिंदे गटाला विचार करायला भाग पाडणार की महायुतीचा धर्म पाळला जाणार, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
मोठी बातमी! छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा, मनी लाँड्रिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त