मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहे. 25 जानेवारीपासून जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांची भाजपचे सध्या चर्चेत असलेले आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला आहे. आमरण उपोषण, आंदोलन आणि महाराष्ट्र दौरा करुन जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार एकतर्फी निकालाने सत्तेमध्ये आले. याचबरोबर जरांगे पाटील यांनी सडकून टीका केलेले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच इतर जुन्या मागण्यांसह जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. काल (दि.28) मस्साजोग गावाचे लोक तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व आई देखील अंतरवलीमध्ये दाखल झाली होती. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईच्या हाताने जरांगे पाटील यांनी पाणी पिले.
आता उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जरांगे पाटील यांची भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सुरेश धस हे सध्या चर्चेत असलेले नेते आहेत. सुरेश धस यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेबाबत जाणून घ्या अपडेट
भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका व्यक्त केली आहे. आमदार सुरेश धस म्हणाले उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली असल्याचे देखील सांगितले आहे. तसेच जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावे अशी विनंती देखील सुरेश धस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी उपचार घ्यावे, असा आग्रह केला असल्याचे देखील आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले. अंतरवाली सराटीत उपोषण स्थळीच मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी सलाईन घ्यावी, अशी विनंती सुरेश धस यांनी केली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे. नियमित त्यांच्या प्रकृतीची तपासणी वैद्यकीय पथकाकडून केली जात आहे. या वैद्यकीय पथकात जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप पाटील आहेत.