संग्रहित फोटो
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती पाठाेपाठ इतर विषय समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर भाजपाच्या नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. पुरेसे संख्याबळ नसणे आणि मुंबई येथील शाेकसभेला नगरसेवक गेल्याने विराेधी पक्षांकडून या विषय समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले गेले नाही. यामुळे २७ फेब्रुवारीला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची नावे जाहीर करण्याची औपचारीकता पिठासीन अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
पुणे महापालिका विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती व नाव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी साेमवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार हाेते. तर २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार हाेती. सत्ताधारी भाजपने प्रत्येक समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करून अर्जही दाखल केले. परंतु विराेधी पक्षांकडून अर्जच दाखल केले गेले नाही. त्यामुळे या समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडही बिनविराेधच झाल्यात जमा आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली. त्यानंतर इतर विषय समितींच्या अध्यक्षपदाकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते.
संख्याबळच नाही!
महापालिकेच्या शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा आणि नाव समित्यांवर प्रत्येकी १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आली. यामध्ये प्रत्येक समितीवर भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारासाेबत, सुचक, अनुमाेदक यांची नावे, स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस यांंच्याकडे संख्याबळच नव्हते. त्यामुळे त्यांनी अर्ज दाखल करण्यास अनुत्सुकता दाखविली. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शाेकसभा मुंबई येथे हाेती, त्याकरीताही पुण्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक गेले हाेते. यामुळे अर्ज दाखल केले नाहीत.
हे सुद्धा वाचा : पुरंदर भूसंपादनाबाबत नवा वाद; शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप
भाजपकडून समितीनिहाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी संधी दिलेल्यांची नावे
विधि समिति : अध्यक्ष – स्वरदा गौरव बापट, उपाध्यक्ष – पायल तुपे
शहर सुधारणा समिती : अध्यक्ष – स्मिता पद्माकर वस्ते, उपाध्यक्ष – सपना आनंद छाजेड
महिला व बालकल्याण समिती : अध्यक्ष – अल्पना गणेश वरपे, उपाध्यक्ष – तन्वी दिवेकर
क्रीडा समिती : अध्यक्ष – नारायण मोहन गलांडे, उपाध्यक्ष – दिनेश महादेव माथवड
शिक्षण समिती : अध्यक्ष – अरुण राजवाडे , उपाध्यक्ष – अतुल तरवडे
नाव समिती : अध्यक्ष – पल्लवी जावळे, उपाध्यक्ष – सुनील पांडे






