भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी (Photo-Social Media)
भाजपच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. पक्षाने आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली असून, या फेरबदलात महाराष्ट्राला विशेष प्रतिनिधित्व मिळाले आहे. केंद्रातील राजकीय घडामोडी आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनेतील या बदलांकडेही महत्त्वाने पाहिले जात आहे.
नवीन कार्यकारिणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. या कार्यकारिणीत विविध राज्यांतील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व मिळणार आहे. मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनाही कोषाध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रिती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीतील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे राष्ट्रीय पातळीवर कमबॅक. त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या नव्या कार्यकारिणीत एकूण 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे खासदार सतीश पूनिया यांना राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
देशातील विविध राज्यांना संघटनेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या कार्यकारिणीत करण्यात आल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील चार नेत्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्यातील भाजप संघटनेच्या दृष्टीनेही या फेरबदलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.