
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु; महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीने व्यूहरचना आखली आहे. निवडणुकांत युती व उमेदवार निवडीवेळी वाद होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती बनविण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, तुल्यबळ उमेदवार असतील तर मैत्रीपूर्ण लढत होईल. या निवडणुकीत महायुती ५१ टक्के मतदान घेईल, असा दावा करत जिल्हा परिषद व मनपा भाजप जिंकेल. विधानसभेपेक्षा जास्त मते मिळतील. एकही जिल्हा परिषद, मनपा महाविकास आघाडी जिंकू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला. काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्याची इच्छा नेहमी व्यक्त करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही.
हेदेखील वाचा : Bihar Assembly election 2025: बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव’च का? काय आहे यामागचं खरं कारण?
दरम्यान, कार्यकत्यांशी चर्चा करत नाही. कोण कुठे आहे याची माहिती काँग्रेसला नाही. चांगले पदाधिकारी हे बाजूला पडलेले आहेत. पक्षातील आणि नेत्यातील संवाद यात फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. भाजपचा कार्यकर्ता कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतो. मात्र, काँग्रेसमध्ये राज्यातील नेत्यांना भेटण्याची कुठेही शक्यता नाही. विसंवाद असल्याने कार्यकर्ते तुटलेले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
नेत्यांनी आचारसंहिता पाळावी
पुण्यातील धंगेकर-मोहोळ वाद स्थानिक राजकारणाचा भाग आहे. धंगेकरांचा मोठा पराभव झाला. मोहोळांवर बोलल्याशिवाय त्यांचे राजकारण पुढे जात नाही. तरीही, धंगेकर हे शिंदे गटात असल्याने त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली नसल्याचे बावनकुळे म्हणाले. महायुतीमध्ये मतभेद वा मनभेद होणारे वक्तव्य करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. युतीधर्माची आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली सूचना भाजप पाळेल. शिंदे गट व राष्ट्रवादीही त्यांच्या नेत्यांच्या सूचना पाळतील, असे बावनकुळे म्हणाले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा