
Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?
मुंबई : अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेने सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे.
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही. बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे.
दरम्यान, विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार? त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार
एकीकडे विजय वडेट्टीवारांनी बारामतीत काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले असताना, आधी बिनविरोध होण्याची चर्चा असणारी ही जागा आता तिरंगी लढतीने गाजण्याची चिन्हे आहेत. कारण याच मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवला आहे.
सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्यावे
सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे, येथे पवार सोडून विधानसभेला उमेदवार द्यावा, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, असे हाके यांनी म्हटलं आहे.
भाजपकडूनही विरोध?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र, एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणावरून निर्माण झालेल्या वादाने या आवाहनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
हेदेखील वाचा : Baramati by-election : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट