गुणरत्न सदावर्ते यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून ठाकरे बंधूंवर केला हल्लाबोल (फोटो - इन्स्टाग्राम)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वंचितांसाठी प्रकाश देणारे आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत सदावर्ते यांनी विविध समाजघटक बाबासाहेबांचा आदर करतात, असा दावा केला. दादर स्थानकाचे नामांतर करण्याच्या मागणीला मुंबईसह देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले. सदावर्ते म्हणाले, “देशभरातील संविधानप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायांसाठी दादर येथील चैत्यभूमीला नाव देण्याचा निर्णय अभिमानाची बाब आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.”
पुढे ते म्हणाले, “प्रत्येक कालखंडात विघ्नसंतोषी आणि अडथळे निर्माण करणारे लोक असतात. असे लोक समोर येऊन बोलत नाहीत, तर पडद्यामागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरे यांच्यावर मी राजकीय टीका करत आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सध्या ‘म्याव म्याव’ करत सुटले आहेत. आमदार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संविधानाची शपथ घेतली आहे, याची त्यांनी जाणीव ठेवावी. कपडे धुताना जशी अवस्था होते, तशीच अवस्था करून घ्याल.”
बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराला विरोध केला होता, तर शरद पवार यांनीही याच प्रकारचे राजकारण केले होते, असा दावा सदावर्ते यांनी केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वकल्याणी, मार्गदर्शक आणि वंचितांसाठी प्रकाश देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे. राज ठाकरे यांचे तुमच्या पक्षातील नेमके कोणते सदस्य आहेत? त्यांना लगाम घाला. अन्यथा, तुमची भूमिका संशयास्पद ठरेल. तुमच्यामुळे दादरवासीय किती त्रस्त झाले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबईसह देशभरातील नागरिक दादर स्टेशनचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याची मागणी करत आहेत. शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता संपुष्टात येईल. संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी विचारपूर्वक भूमिका घ्यावी. तुम्ही सुज्ञ आहात, पक्षात याबाबत चर्चा करा. सुषमा अंधारे ताई कुठे हरवल्या आहेत? या नामांतराला तुमचा विरोध आहे का, याचे उत्तर द्या.”
पिसाळलेल्या कुत्र्यांना मी उत्तर देत नाही – सदावर्ते
पुढे ते म्हणाले, “काँग्रेससोबत असलेल्या लोकांच्या विचारांना कोणीही किंमत देत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आवाहन करतो की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाऊ नका. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची परंपरा पुढे चालवा. या प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही. रोहित पवार, हे कोणते वर्तन आहे? पिसाळलेल्या कुत्र्यांना मी उत्तर देत नाही. नवनाथ बन साहेब बिगरमराठा आहेत म्हणून त्यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नाही का?”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावरही सदावर्ते यांनी टीका केली. रोहित पवार यांच्या भूमिकेमागचे कारण काय, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. दादर स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Ans: दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या निर्णयाचे सदावर्ते यांनी स्वागत केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
Ans: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दादर स्थानकाच्या नामांतराबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडावी आणि बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
Ans: दादर येथील चैत्यभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे.






