भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व इच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेत (शिंदे गट) जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा १३७ जागा तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना ९० जागांवर निवडणूक लढणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झाले आहे. याबाबत साटम म्हणाले, बीएमसीत भाजपा, शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे. यापूर्वी आमची २०७ जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. आता आमची २२७ जागांवर चर्चा झाली आहे. भाजप १३७ जागा तर, शिवेसना ९० जागा लढवणार आहे. महायुतीच्या मित्रपक्षांचा यातच समावेश आहे. त्यांना भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेदेखील वाचा : Pune Politics : पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने सोमवारी ८७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने जुन्या चेहऱ्यांना संधी देताना काही नवीन नावांचाही समावेश केला आहे. जुन्या चेहऱ्यांमध्ये शीतल म्हात्रे, अजंता यादव, आशा कोपरकर यांचा समावेश आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती केली आहे.
150 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार : शेवाळे
आमच्यात सकारात्मक चर्चा होऊन चांगला फॉर्म्युला ठरला आहे. २२७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवून १५० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आहोत, असा दावा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला.
पुणे महापालिकेसाठी विविध पक्षांची तयारी
दुसरीकडे, पुणे महापालिकेच्या निवडणुका केवळ दुरंगी न होता त्या काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी होतील, असे आता दिसू लागले आहे. पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाल्यावर काही प्रभागात बंडखोरी देखील होईल. मोठ्या शहरांमध्ये विविध विचारांचे समुदाय असतात. त्यामुळे शहरांचे राजकारण विविध रंगी असते. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष ठळकपणे लढतीत असतातच. याखेरीज प्रादेशिक पातळीवर बस्तान बसविलेले पक्ष सुद्धा निवडणुकीत उतरतात. अशा पक्षांशी युती अथवा आघाडी करायची वेळ राष्ट्रीय पक्षांवर येते.






