"कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता", उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका
मंत्री सामंत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे हे नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीसाठी मागील १० दिवसांपासून प्रचार करत आहेत. मागील आठवडाभर घरी न जाता प्रचार करत असून या दौऱ्यात ते मुक्काम करतात. त्यामुळे मालवणमध्ये येताना त्यांच्यासोबत कपड्याच्या बॅगा होत्या, मात्र नाईक यांनी या बॅगांमध्ये पैसे असल्याचा बालिश आरोप लावला, असा टोला मंत्री सामंत यांनी लगावला. उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केल्यानंतर उबाठा खूश होतील, असा नाईक यांचा गैरसमज असावा त्यामुळेच नैराश्यातून त्यांनी आरोप केला, असे मंत्री सामंत म्हणाले. जे नेते घरातून बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थितीच निर्माण होत नाही, अशी टीका मंत्री सामंत यांनी उबाठावर केली.
सिंधुदुर्गात नैसर्गिक आपत्तीवेळी शिंदे यांनी मदत केली होती. अनेक घरांचे छत बनवून दिले. ही मदत लोकांसाठी नव्हती तर वैभव नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला झळ बसू नये, म्हणून देखील होती. आपत्ती काळात नाईक कुठेही फिरले नव्हते मात्र शिंदे यांनी मतदार संघात भरघोस मदत केली. मात्र नाईक यांना या मदतीचा विसर पडला. यातून नाईक यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते, अशी खरमरीत टीका मंत्री सामंत यांनी केली. नाईक शिवसेनेसोबत आले नाहीत, याचा कधीही मनात राग न ठेवता त्यांना लागेल ती मदत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. राजकारणात विरोधात असतानाही जेव्हा मदत मिळते, तेव्हा त्याची जाणीव ठेवायला हवी, असा सल्ला मंत्री सामंत यांनी यावेळी नाईक यांना दिला. ते पुढे म्हणाले की, हजारो कार्यकर्ते हेच शिंदेंची खरी ताकद आहे. त्यांना पैसे वाटण्याची गरज नाही.
ते पुढे म्हणाले की महायुतीचे तिन्ही नेते जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा कुठेही मित्र पक्षांवर टीका करत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतल्या. ईश्वरपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आले होते. नेते परिपक्व आहे ते एकमेकांवर टीका करत नाही. महायुती टिकवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान असले पाहिजे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.






