(Photo - X)
Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदूरमध्ये आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय कायम ठेवावी, असं आवाहन केलं. ‘सिस्टीमला विद्यार्थी नकोत, अंधभक्त हवेत’, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं.
विद्यार्थी जिज्ञासू असतात आणि प्रत्येक गोष्ट सांगितली म्हणून लगेच स्वीकारत नाहीत. एखादी गोष्ट का घडते, त्यामागचं कारण काय आहे, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळेच विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि यंत्रणेला अशा प्रश्नांची भीती वाटते, असं राहुल गांधी म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. संस्था योग्य पद्धतीने काम करत आहेत का, हे विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी त्यावर विचार करावा आणि आपली भूमिका मांडावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात
राहुल गांधी यांनी ‘अंधभक्त’ या शब्दाचा वापर करत प्रश्न न विचारता प्रत्येक गोष्ट स्वीकारणाऱ्या मानसिकतेवर भाष्य केलं. विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रेम, आदर आणि विनम्रतेशी जोडत त्यांनी विद्यार्थी दुसऱ्यांचं ऐकतात, प्रश्न विचारतात आणि आपली बाजू मांडतात, असं सांगितलं. याचवेळी त्यांनी द्वेष, अहंकार आणि भीतीचाही उल्लेख केला.
विद्यार्थ्यांच्या समस्यांवर बोलताना राहुल गांधी यांनी पेपरफुटी आणि बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. शाळा आणि महाविद्यालयांची परिस्थिती कशी आहे, पेपर का फुटतात आणि तरुणांना रोजगार का मिळत नाही, असे प्रश्न विद्यार्थी विचारतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची बाजू ऐकली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपापल्या समस्या राहुल गांधींसमोर मांडल्या. आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, वनपट्टे, रिक्त पदे आणि सरकारी वसतिगृहांची स्थिती यासारखे मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले.
समस्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा एका विद्यार्थ्याने केला. सरकारी भरती आणि पेपरफुटीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. नोकरभरतीसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होतात आणि तुरुंगात जावं लागतं, असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला.
एका विद्यार्थ्याने विद्यापीठातील प्रवेश आणि परीक्षांशी संबंधित समस्याही मांडल्या. गुणवत्ता असूनही मास्टर्स अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार त्याने केली. त्यामुळे शिक्षण, रोजगार आणि सरकारी भरतीशी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न या कार्यक्रमात केंद्रस्थानी राहिले.






