
"विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा...", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
गोंदिया नगराध्यक्षपदासाठी डॉ. प्रशांत कटरे यांच्यासह शिवसेनेचे ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषद शिवसेना स्वबळावर लढत आहे. शिवसेनेने डॉ. कटरे यांच्या रुपात सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. शहरातील समस्यांचे मुळासकट निवारण करेन, असा संकल्प डॉ. कटरे यांनी केला आहे. त्यामुळे गोंदियावासीयांनी डॉ. कटरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांना केले.
प्रस्थापितांनी इथे अनेक वर्ष सत्ता गाजवली मात्र गोंदियाची अवस्था बिकट झाली. गोंदियाच्या विकासासाठी आता परिवर्तनाची गरज आहे, कचरामुक्त गोंदिया, प्रदूषणमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त गोंदिया करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे ते म्हणाले. रामटेकसाठी २००० कोटींचा निधी दिला. गोंदियासाठी कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. महिलांचे कष्ट जवळून बघितले आणि त्यातूनच लाडकी बहिण योजनेचा जन्म झाला, असे ते म्हणाले. धनदांडग्यांना १५०० रुपयांची काय किंमत कळणार, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केली. याच लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवला. आतापर्यंतच्या इतिहासात महायुतीला २३२ जागा मिळाल्या. लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. ज्याच्या पाठिशी लाडक्या बहिणींची ताकद त्याचा विजय पक्का असे ते म्हणाले.
भंडारामध्ये घेतलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की भंडारा विधानसभा मतदार संघात आमदार नरेंद्र भोंडेकर यांना ३००० कोटींचा विकास निधी दिला. आमदार भोंडेकर भंडाऱ्याच्या विकासाचे सूत्रधार आहेत. आदर्श आमदार आणि लोकप्रतिनिधी भोंडेकरसारखा असावा, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भंडारा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेने डॉ. अश्विनी भोंडेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अडीच वर्षांत मुख्यमंत्री असताना केलेल्या विकास कामांमुळे राज्याच महायुतीचे सरकार बहुमताने विजयी झाले. भंडाऱ्यात भगवा फडकवण्यासाठी एक उच्चशिक्षित नगराध्यक्ष आवश्यक आहे. डॉ. अश्विनी भोंडेकर यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. कोरोनाकाळात डॉ. अश्विनी यांनी काम केले. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने, पदाधिकारी लोकांना मदत करत होते. जिथे संकट तिथे शिवसेना हे समीकरण आहे. शिवसेनेने भंडारा नगर परिषदेसाठी एक मजबूत उमेदवारांचे पॅनल दिले आहे. या सर्व पॅनलला विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी येथील मतदारांना केले.