सौजन्य - नवराष्ट्र टीम
युवा प्रशिक्षणार्थीच्या न्याय, हक्कासाठी मागील वर्षभरापासून ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारला आहे. मुंबईचे आझाद मैदानावर ठिय्या मांडला, हजारो युवा प्रशिक्षणार्थीना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्री आंदोलन केले. सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले, पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंद्रायणी डोहात गाथा बुडविल्या होत्या तेथून युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासाठी पायी दिंडी सुरू केली. तुकाराम बाबांच्या या दिंडी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थीना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली व तसा अध्यादेश जारी केला. ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश मानले जाते. त्यांच्यामुळे पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली पण पुढे काय हा मुख्य प्रश्न होता.
विविध मार्गे आंदोलन, ३६ जिल्ह्यांचा दौरा
तुकाराम बाबांनी पुन्हा आंदोलन हाती घेत ३६ जिल्ह्यांचा दौरा केला. तसेच युवा प्रशिक्षणार्थी संघटित केले. सांगलीच्या कृष्णामाई घाटावर आमरण उपोषण, अन्नत्याग आंदोलन सुरू केले. पाच दिवस सांगलीतील स्टेशन चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक येथील गोदावरी घाटावर आमरण उपोषण सुरू केले. नुकतेच त्यांनी माजी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यात भेट घेत निवेदन दिले.
पाठपुरावा करून तरुणांच्या हाताला रोजगार देऊ – शहाजीबापू पाटील
राज्यातील युवकांना प्रशिक्षण मिळाले पण त्यांच्यावर पुन्हा ११ महिन्याची मुदत संपल्याने बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. लाखो तरुणांना रोजगार व आत्मविश्वास वाढला. या तरुणाईने महायुतीला भक्कम साथ दिली आहे तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडणे बरोबर नाही. ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करून तरुणांचा हाताला रोजगार मिळवून देणारच असल्याचे सांगोल्याचे माजी आमदार तथा शिवसेनेचे वरिष्ठ नेते शहाजीबापू पाटील यांनी यावेळी युवा प्रशिक्षणार्थीशी बोलताना सांगितले.






