
CJP Protest, JP Nadda, Delhi Protest, Parliament March, CJP Protest
Cockroach Janta Party Protest Impact On Govt: राजधानी दिल्लीत सोमवारी (20 जुलै) दिवसभर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. संसद आणि जंतर मंतरच्या आसपासचे सर्व रस्ते गर्दीने खचाखच भरले होते. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक तरुणांमध्ये संघर्ष झाला. कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या संसद मोर्चामुळे संसद भवनाजवळची जवळपास सर्व मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. असे असतानाही, गर्दीत कोणतीही कमतरता दिसत नव्हती. पोलिसांची परवानगी नसतानाही संसद मोर्चा सुरूच राहिला, ज्यामुळे पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. (Abhijeet Dipke)
देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बदल आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सीजेपीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. सीजेपी फक्त सोशल मीडियावरच अस्तित्वात आहे… जमिनीवर त्याचे कोणतेही अस्तित्व नाही असे दावे केले जात होते. पण अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत सीजेपीचा चाहतावर्ग सातत्याने वाढतच चालला आहे. पण त्यानंतरही सोशल मीडियवर सीजेपीचा वाढणारे फॉलोवर्स बनावट असल्याचा दावा केला होता. लक्षणीय बाब म्हणजे, सोमवारच्या आंदोलनाने हे सर्व दावे खोडून काढले.
लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. विद्यार्थ्याच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर आता मौन बाळगणे शक्य होणार नाही. जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकारला आपला आवाज ऐकवला की समस्या केवळ शिक्षण व्यवस्थेपुरत्या मर्यादित नाहीत, तर बेरोजगारी आणि महागाईसारख्या इतर समस्यांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, हे सीजेपीच्या कालच्या आंदोलनातून दिसून आले.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, “आज सकाळी प्रथमच आंदोलनकर्त्यांनी सरकारसोबत संवाद साधण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सकाळी ११.५० वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी दुपारी सुमारे ४ वाजता लेखी निवेदन सादर केले. तसेच आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन मागे घेऊन परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊनही सरकारने त्यांच्या मुख्य मागण्यांवर अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे या आंदोलनाचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी म्हटले की, “आज जंतर-मंतरवर दिसलेली नवी पिढी केवळ स्वतःसाठी नव्हे, तर न्याय्य शिक्षण व्यवस्था, रोजगाराभिमुख धोरणे आणि जनतेला उत्तरदायी असलेल्या राजकीय व्यवस्थेसाठी लढत आहे.”
ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्या हवाल्याने बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे की, सरकारने या आंदोलनातून धडा घेतला नाही, तर ती मोठी चूक ठरू शकते. तरुणांची मोठी उपस्थिती आणि त्यांचा उत्साह पाहता, कोणत्याही परिस्थितीत संसदेपर्यंत मोर्चा काढण्याचा त्यांचा निर्धार स्पष्ट दिसत होता, आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला असला, तरी आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत. त्यामुळे तरुणांमधील वाढत्या असंतोषाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचा इशारा या आंदोलनातून मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनाने लोकशाहीबाबतचा जनतेचा विश्वास आणि नागरिकांच्या सहभागाची ताकद अधोरेखित केली आहे. सरकारने जनतेच्या भावना आणि मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करू नये. अन्यथा भविष्यात अशा आंदोलनांचे स्वरूप अधिक व्यापक होऊ शकते, असेही स्मिता शर्मा यांनी म्हटले आहे.