काँग्रेस माजी आमदार राहुल बोंद्रे महिलांवर कुंकू मंगळसूत्र वादग्रस्त विधान केले (फोटो - सोशल मीडिया)
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांची भेट घेतली. त्यानंतर बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. या राजकीय भेटीचे कारण नेमके काय होते यावरुन माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नाला उत्तर देताना माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. ते म्हणाले की, जी कुणी महिला असते. जीला दाखवावं लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते, असे अजब उत्तर त्यांनी या पक्ष बदलाच्या प्रश्नावर दिले. बोंद्रे यांचं उदाहरण तर चुकलंच पण त्यांची जीभही घसरली. त्यांच्या या उदाहरणामुळे वेगळाच अर्थ निघाला. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
हे देखील वाचा : “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी यावेळी भाजपवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “भाजपवाल्यांची देशभरात अशीच पॉलिसी आहे. ज्यांना पक्षात आणायचे आहे, त्यांच्याविषयी चर्चा करत राहायची. कार्यकर्त्यांवर दबाव वाढवायचा. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा. ते एक सुनियोजीत चाल खेळतात. त्यानुसार ते चर्चा करतात,” असे राहुल बोंद्रे हे पक्षप्रवेशाबाबत बोलले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “मी एकदाच सांगितले आहे. मला परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जी कोणी महिला असते. तिला दाखवावं लागतं ती किती पतीव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते. मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते,” असे उदाहरण राहुल बोंद्रे यांनी दिले. बोंद्रे यांच्या वक्तव्याने आता खळबळ उडाली आहे. यावर चर्चांना उधाण आले असून त्यांनी भावना दुखावल्या असल्याची चर्चा सुरु आहे.
हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य






