NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य
विलीनीकरण’ हा वरिष्ठ नेत्यांचा आणि राजकारणाचा भाग
विलीनीकरणाच्या तांत्रिक आणि राजकीय प्रक्रियेवर बोलताना जय पवार यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, “विलीनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक अशी कोणतीही भूमिका नाही. मी अजून लहान आहे. यावर सुनेत्रा वहिनी (आई), पार्थ दादा आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. विलीनीकरण हा पूर्णपणे राजकारणातील भाग आहे, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणे योग्य ठरणार नाही.”
जय पवार यांनी राजकीय संघर्षापेक्षा कौटुंबिक एकोप्यावर अधिक भर दिला आहे. ते म्हणाले की, जेव्हा (अनंतराव) दादा आपल्याला सोडून गेले, तेव्हा पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. तो एकीचा काळ आम्ही पाहिला आहे.आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. आमच्यात संवाद थांबलेला नाही. राजकारण आपल्या जागी असले तरी, एक कुटुंब म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र राहावे, असे मनापासून वाटते.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांकडून ‘एकच राष्ट्रवादी’ असावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनीही विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. अशा परिस्थितीत जय पवार यांच्या या विधानाने, राजकीय विलीनीकरण तांत्रिकदृष्ट्या कधी होईल हे सांगता येत नसले तरी, पवार कुटुंब मानसिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्यास काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनीही बारामतीच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. यावरुन बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे मानले जात आहे. पण जय पवार (Jay Pawar) यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सर्व बारामतीकरांचीही हीच भावना आहे. अशी प्रतिक्रीया दिली आहे.
पोटनिवडणुकीच्या चर्चेवर बोलताना जय पवार म्हणाले, “बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह शरद पवार साहेबही करत आहेत. अजितदादांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांनी पाहिले आहे. संपूर्ण बारामती हे दादांचे कुटुंब असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेच सर्वांना वाटते.” आता जय पवार यांच्या या विधानानंतर बारामतीत पुन्हा एकदा राजकीय समझोता होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






