
harshvardhan sapkal on Sunetra pawar
राज्यातील राजकीय वातावरणात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरादार वाद रंगू लागला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर सोशल मीडियावर बोचरी टीका केल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पक्ष वादात सापडला असून यावरून राष्ट्रवादीने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. अश्यातच आता काँग्रेसकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे विधान केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात असलेल्या नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित असते. त्यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, एका नेत्याने पत्रकारांना गप्प बसण्यास सांगितले, मात्र त्या वेळी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही,” असा आरोप केला. त्यांच्या मते, त्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वापरलेला “गुंगी गुडिया” हा शब्दप्रयोग करण्यात आला असून तो वैयक्तिक टीका नसून त्यांच्या भूमिकेचे वर्णन असल्याचा दावा त्यांनी केला.
सपकाळ यांनी पुढे म्हटले की, “सुनेत्रा पवार विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगतात. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील प्रकरण, अर्थ खात्याचा मुद्दा तसेच इतर राजकीय घडामोडींवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा विषयांवर स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित असते.”
‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगाबाबत बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “इंदिरा गांधींनाही एकेकाळी अशाच प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांनी आपल्या कामगिरीतून उत्तर दिले आणि नंतर त्यांना “दुर्गा” अशी उपमा मिळाली. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कार्यातून उत्तर द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवरही टीका केली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांबाबत निर्णय प्रक्रियेत अडथळे येत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षावर भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची टीका केली. तसेच, अर्थ खाते, शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटरचा प्रश्न आणि इतर प्रलंबित मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत सार्वजनिक जीवनातील महिलांबाबत सन्मानपूर्वक भाषा वापरण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. आता काँग्रेसकडून या टीकेचे समर्थन करण्यात आल्याने दोन्ही पक्षांतील हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.