
'धर्मेंद्र प्रधानांनंतर आता "टोलकरी गडकरीं"; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता कॉकरोच जनता पार्टीचा पुढचा निशाणा कोण असणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख यांनी तिरंगा रॅलीत गडकरींवर निशाणा साधत त्यांच्या धोरणावर टीका केली होती. अश्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर मोठे भाष्य करत ‘धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता “टोलकरी गडकरी” यांचा राजीनामा झाला पाहिजे,’ असे वक्तव्य केले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरात विद्यार्थी आंदोलकांकडून एकाच जल्लोष करण्यात आला. यावरून राजकीय प्रतिक्रिया येत असून हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपल्या अधीकृत ‘X ‘ अकाऊंटवरून यावर भाष्य केले आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ते म्हणाले, “नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे. सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे.”
टोलकरी, #गडकरी_राजीनामा_द्या.
इथेलॉन मिश्रित पेट्रोल डिझेल/विकणे हा देखील मोठा भ्रष्टाचारच.
निष्पाप आंदोलन विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करणे जशी विकृती, तसेच करोडो सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खराबी तितकाच विकृत भ्रष्टाचार. pic.twitter.com/KceJVBRC4q — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 26, 2026
“एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठा स्कँडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेलं आहे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा-तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंकडून ‘तिरंगा’ रॅलीचे आयोजन आज (रविवार, 26 जुलै) करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख करत त्यांना सुरुवातीला “खड्डामंत्री” असे संबोधले. त्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्ती करत “केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी” असा उल्लेख केला. त्याचवेळी इथेनॉलच्या मुद्द्यावर पुढील काळात मोठी चर्चा होईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.