
जुने विरोधक एकत्र; बदलत्या समीकरणांकडे सर्वांचे लक्ष
इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ
भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान
इंदापूर: तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे या निवडणुकीत एकत्र आले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनपेक्षित राजकीय मनोमिलनामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, भारतीय जनता पक्षासमोर (BJP) मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दुसरीकडे, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली अनेक भरणे-पाटील यांचे कठ्ठर समर्थक बंड करून कमळ चिन्हावर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी बोरी पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी बावडा–लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून घड्याळ या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे हे वडापुरी–माळवाडी गटातून प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी काटी–लाखेवाडी गटातून जिल्हा परिषदेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
BMC बजेट लांबणीवर? महापौर निवडीमुळे ५ फेब्रुवारीची मुदत हुकण्याची शक्यता; काय आहे नेमका पेच?
बुधवारी (दि. २१) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने इंदापूर प्रशासकीय भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. अनेक उमेदवारांनी समर्थकांसह उपस्थित राहत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खुडे व तहसीलदार जीवन बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी (दि. २२ जानेवारी) उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे त्या दिवशी अंतिम उमेदवार व त्यांची निवडणूक चिन्हे स्पष्ट होणार आहेत.
Maharashtra Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप? हसन मुश्रीफांना मोठा धक्का; नेमका विषय काय?
यंदा जिल्हा परिषद गटांची संख्या ७ वरून ८ तर पंचायत समिती गणांची संख्या १४ वरून १६ झाली आहे. तालुक्यात एकूण ३ लाख २१ हजार २ मतदार असून ४०० मतदान केंद्रांची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ८ पैकी ६ जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव असल्याने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या गृहलक्ष्मीला पुढे केले असून, इंदापूरच्या राजकारणात महिला नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे येताना दिसत आहे.