शिवसेनेच्या चिन्हावर आज 'सुप्रीम' सुनावणी
मुंबई : शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. या प्रकरणाची न्यायालयात सतत सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आज या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे. सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की, राज्यघटना आणि पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ पक्षांतराला प्रोत्साहन देईल, अशाप्रकारे लावू नये. विधिमंडळ पक्षाची ताकद आणि मूळ राजकीय संघटनेचे हक्क यांच्यात संतुलन कसे साधावे, याचाही न्यायालय विचार करत आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या (उबाठा) सहा खासदारांना शिंदे गटात सामील होण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. आता राज्यातील जनतेचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल म्हणाले होते की, घटनात्मक तरतुदीचा अर्थ अशा प्रकारे लावला जाऊ शकत नाही, ज्यामुळे पक्षबदलाच्या पापाला प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले की, पक्षबदल रोखण्यासाठी बनवलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, सिब्बल यांनी विचारले की, जर एकनाथ शिंदे शिवसेनेची घटना वैध मानत नव्हते, तर त्यांनी २०१८ मध्ये आक्षेप का घेतला नाही? ते म्हणाले की, २०१८ च्या घटनेनुसार शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडून आले आणि मंत्रीही झाले. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे यांनी पक्षाच्या घटनेचे पालन करण्यास नकार दिला. हा एक गंभीर विरोधाभास आहे.
कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी २०१८ मधील पक्षघटनेशी संबंधित कागदपत्रांचा संदर्भ देत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. आयोगाकडे आवश्यक कागदपत्रे आणि पक्षाच्या रचनेबाबतची माहिती उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.