Bihar Elections 2025 : जेडीयूच्या आमदाराचे मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन; 'तिकीटाशिवाय इथून जाणार नाही'
पटना : बिहार विधानसभा निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, भाजप, जेडीयूसह राज्यातील अनेक पक्षांकडून तयारीही केली जात आहे. त्यात अनेक इच्छुकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असताना याच उमेदवारीसाठी संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार गोपाल मंडल यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. यामध्ये त्यांनी तिकीट मिळाल्याशिवाय जाणार नसल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपाची चर्चा सुरू असतानाच जेडीयूचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल सोमवारी अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आले होते आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून तिथे वाट पाहत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. ‘मला मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. मी सकाळपासून वाट पाहत आहे. मला निवडणुकीचे तिकीट मिळेल. मी तिकीट न मिळाल्यास निघणार नाही’, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
हेदेखील वाचा : Bihar Election 2025 : NDAचं जागावाटप निश्चित; कुणाला मिळाल्या किती जागा? महाआघाडीचं घोडं कुठे अडलं?
गोपाल मंडल म्हणाले की, ‘जेडीयूचे काही वरिष्ठ नेते माझ्याविरुद्ध राजकारण करत आहेत. ते माझे तिकीट कापू इच्छितात, म्हणून ते सध्या माझे प्रतिस्पर्धी अजय मंडल उर्फ बुलो मंडल यांच्या संपर्कात आहेत. ते त्यांना तिकीट देऊ इच्छितात. मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माझा नेता मानतो. ते न्याय देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे’.
दरम्यान, गोपाळपूरचे आमदार गोपाळ मंडल यांच्या या कृतीमुळे जेडीयूच्या गोट्यात खळबळ उडाली आहे. या जागावाटपादरम्यान पक्षाचे अनेक विद्यमान आमदार नाराज आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, काही जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू आहे, ज्यामुळे विद्यमान आमदार नाराज आहेत. मुख्यमंत्री भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली आहे आणि गोपाळ मंडल यांच्याशी बोलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेदेखील वाचा : Bihar Election 2025: राजकीय मोठी बातमी; NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?