मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला
KDMC Politics : पुण्यातील एका शाळेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Photo) यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले आहे. या वादाचे पडसाद बुधवारी (9 सप्टेंबर 2026) झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपने या प्रकरणाचा निषेध करत महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची मागणी केली. अखेर महापौर हर्षाली चौधरी यांनी महासभा तहकूब केली.(KDMC Politics)
बुधवारी आयोजित महासभेत भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी मोदींच्या फोटोप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या घटनेचा निषेध करत महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भाजपच्या या भूमिकेला शिवसेना शिंदे गटासह शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिला. मात्र, मनसे आणि काँग्रेसने सभा तहकूब करण्याच्या निर्णयाला विरोध करत भाजपवर जोरदार टीका केली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे सत्तेत आहेत. पुण्यातील फोटोप्रकरणानंतर भाजपने मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडे केली होती. मात्र, शिंदे गटाने ही मागणी मान्य केली नाही. उलट या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेवरच टीका करण्यात आली होती. त्यामुळे केडीएमसीच्या महासभेत भाजप कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी महासभा तहकूब केल्याच्या निर्णयावरून भाजपला लक्ष्य केले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महासभा आयोजित केली जाते; मात्र राजकीय मुद्द्यावर सभा तहकूब करणे म्हणजे केवळ नाटक असल्याची टीका त्यांनी केली. भाजपचा मनसेला एवढाच विरोध असेल, तर सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेत राहून त्याचवेळी विरोध दाखवण्याची भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनीही महासभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘एवढा विरोध आहे तर सत्तेतून बाहेर का पडत नाही? सत्तेची मलाई खाण्यासाठी तुम्ही सत्तेत आहात. महापौर आम्ही बसवला आहे. आमच्याकडे बहुमत आहे. तुम्ही सत्तेतून बाहेर पडा,’ अशा शब्दांत म्हात्रे यांनी भाजपला आव्हान दिले.
मोदींच्या फोटोप्रकरणामुळे केडीएमसीतील सत्ताधारी पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेची सत्ता कायम असताना दुसरीकडे राजकीय मुद्द्यांवर तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष होत असल्याचे चित्र आहे. महासभा तहकूब करण्याच्या मुद्द्यावर मनसेने थेट भाजपलाच सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान दिल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. आता या वादाचा आगामी काळात केडीएमसीतील सत्तासमीकरण आणि तीन पक्षांच्या संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश






