'बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,' जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या 16व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई आंदोलनावर ठाम भूमिका घेतली. 15 सप्टेंबरला समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार असून, 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली.
‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत, त्यांचे अधिकारी आता शनिवारी आणि रविवारीही काम करत आहेत,’ अश्या शब्दांत त्यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला. पाऊस असो किंवा ऊन, मराठा समाज मुंबईत येणारच, अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली. आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या संसारावर परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाटोदा आणि श्रीगोंदा येथे मुक्काम करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आंदोलनासाठी आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत करणाऱ्या व्यक्तींवर चौकशी लावली जात असल्याचा आरोप जरांगेंनी केला. समाजातील श्रीमंत व्यक्तींनी आंदोलनाला मदत केली तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना जरांगेंनी त्यांच्या यंत्रणेमार्फत आपल्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात असल्याचा दावा केला. नोटिसा, चौकशा किंवा दबाव आणून आंदोलन थांबणार नाही, उलट आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात अडचणी निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंत यांच्यावरही जरांगेंनी निशाणा साधला. गेल्या वर्षीही मुंबईत गणेशोत्सव होता आणि त्यावेळी मराठा समाजाने शांततेत आंदोलन केलं होतं, मग यंदाच हा मुद्दा का उपस्थित केला जातोय, असा सवाल त्यांनी केला. चौकशी आणि दबावाच्या माध्यमातून आंदोलन थांबवता येणार नाही. उलट त्यामुळे समाजाचा रोष आणखी वाढेल, असं जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं. मराठा समाजाने शिंदेंवर विश्वास ठेवला, त्यांचा सन्मान केला आणि सरकारकडून मिळालेल्या निर्णयांचं स्वागत केलं, याची आठवण त्यांनी करून दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि सरकारसोबत सकारात्मक वातावरण तयार झालं, तर राजकीय समीकरणं बदलू शकतात, असा सूचक इशाराही जरांगेंनी दिला.
‘आता जे काही होईल ते मुंबईत होईल. कायदेशीर मार्गाने अर्ज केला आहे आणि न्यायालयाच्या अटी-शर्तींचं पालन करून आंदोलन करू. पण आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही मागे हटणार नाही,’ अशी ठाम भूमिका जरांगेंनी मांडली.
आता 15 सप्टेंबरला जरांगे पाटील नेमक्या किती समर्थकांसह मुंबईकडे रवाना होतात आणि 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानातील आंदोलनाबाबत प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






