
मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच (photo Credit - X)
शांतीनगर येथील मतदान केंद्रावर भाजपच्या पोलिंग एजंटने चक्क आपल्या उमेदवाराचे नाव असलेला बॅच लावून हजेरी लावली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, पोलिंग एजंटला केवळ आयोगाचे अधिकृत ओळखपत्र लावण्याची परवानगी असते. कोणत्याही पक्षाचे चिन्ह, नाव किंवा उमेदवाराचा प्रचार होईल असा बॅच लावणे बेकायदेशीर मानले जाते.
भाजपचा रडीचा डाव सुरू झालाय…
चक्क मतदान केंद्रात भाजपा उमेदवारांची नावे लावून प्रचार करत आहेत..
मीरारोड परिसरातील धक्कादायक प्रकार #viralvideo pic.twitter.com/PqfDPFjt44 — Sandeep Udmale (@sandeepudmale5) January 15, 2026
BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…
ही बाब मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे आणि मनसे उमेदवारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, बराच वेळ उलटूनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. “प्रशासनाकडून पक्षपात केला जात असून नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे,” असा संताप संदीप राणे यांनी व्यक्त केला.
या प्रकरणावर काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करून काहीही करू शकतो. इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशात आहे, त्यामुळे अशा घटनांचे आता नवल वाटत नाही.” प्रशासकीय यंत्रणा भाजपला अनुकूल काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात आणि केंद्राच्या आत कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास मनाई असते. पोलिंग एजंटने उमेदवाराचे नाव असलेला बॅच लावणे हा आचारसंहितेचा भंग मानला जातो. या प्रकरणी आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंद्रलोक येथील तपोवन विद्यालयातील मतदान केंद्रावर आज मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याची घटना घडली. या केंद्रावर प्रभाग क्रमांक ११ आणि १२ साठी मतदान सुरू असून, मशीन बिघडल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवावी लागली.
मशीन बंद पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मतदान केंद्रात गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रभाग ११-ड मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मशीन दुरुस्त करण्यासाठी सुमारे एक तास लागला. त्यांच्या म्हणण्यानुसार, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासमोरील ‘गॅस सिलेंडर’ या निवडणूक चिन्हावरील बटन दाबले जात नव्हते.
या संदर्भात निवडणूक कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. अखेर सुमारे एक तासानंतर मशीन दुरुस्त करण्यात आली असून सध्या ती सुरळीतपणे कार्यरत आहे. मात्र या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत संशय निर्माण झाल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी तात्काळ मशीन बदलण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. बिघडलेली ईव्हीएम मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच मतदान पूर्णपणे सुरळीत होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.