राज्यात मनपाच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार केंद्रावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि राज्यातील इतरत्र मतदार केंद्रावर शाई पुसली गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असून या भोंगळ कारभारामुळे निवडणूक आयोगावर मतदारांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. बोगस शाईप्रकरणावर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत असातानाच निवडणूक आयोगाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप राजकारणी नेत्यांनी देखील केला. मुंबई मनपाक्षेत्रात देखील शाई पुसण्याच्या प्रकारामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतला होता. ठाकरे म्हणाले की, सरकारने निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. त्यांनी जे विधानसभेच्या निवडणूकीत केले, तेच त्यांना आता देखील करायचे आहे. पण आता आम्ही असं होऊ देणार नाही. आजपर्यंत मतदान केल्यानंतर शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण केली जात आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही.
याचपार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर शाई पुसण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत चौकशी करत आहोत. शाई का पुसली जात आहे याची तपासणी करण्यात येईल. मतदeरांनी असं देखील म्हटलं की, यावेळी मतदान करताना मार्कर पेन वापरला गेलाय. मात्र मतदान प्रक्रियेत निवडणूक आयोगाकडून याआधी देखील मार्करपेन वापरण्यात आलेला आहे. मतदारांच्या बोटावर शाई लावताना ती गडद रंगाने लावण्यात यावी, अशा आम्ही सुचना दिल्या आहेत असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या या प्रतिक्रयेवर देखील मतदार नाराज झालेले आहेत. मतदान प्रक्रियेला निवडणूक आयोग इतक्या हलक्यात कसं काय घेऊ शकतो? हीपैशांचे वाटप, बनावट मतदार आणि आता मार्करची पुसणारी शाई या सगळ्या प्रकरणामुळे मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडत जात असल्याचं मतदारांनी म्हटलं आहे.






