BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु
या प्रकरणी पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण आणखी तापलं. याप्रकरणी आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक नेत्यांनी आरोप केला आहे की, बोटावरील शाई पुसून बोगस मतदान देखील केलं जात आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या वादावरून आता राज ठाकरेंनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, सरकारने निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. त्यांनी जे विधानसभेच्या निवडणूकीत केले, तेच त्यांना आता देखील करायचे आहे. पण आता आम्ही असं होऊ देणार नाही. आजपर्यंत मतदान केल्यानंतर शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण केली जात आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही.
मतदानातील शाई प्रकरण आणि राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रेयवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही निवडणूकांमध्ये मार्करचा वापर झाला आहे. जर काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही.
BMC Election 2026: मतदानादरम्यान वांद्रेमध्ये ईव्हीएम मशीन बंद! केंद्राबाहेर गर्दी, मतदारांचा गोंधळ
मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत. याबाबत अनेक तक्रारी पालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहेत. मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली आहे, असा संशय मतदारांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकरणानंतर शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा, अशा सूचना मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.






