mla rohit pawar reaction on Dhananjay Munde Resignation News
मुंबई : राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत अर्थिक संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा भार धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र आता त्यांना पदातून मुक्त करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावर आमदार रोहित पवार म्हणाले की, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर लघुशंका केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे हे फोटो आले असावेत. तरीही धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर आता रोहित पवार म्हणाले की, “वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे हे जगाला माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पाठराखण करु नका हे मला सांगायचं आहे. पंकजा मुंडेंनाही माझी विनंती आहे की मीडियासमोर या, तुमची भूमिका मांडा. आज जर थोरले मुंडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडून काढलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. आज सरकारने जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही कामकाज चालू देणार नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या सरकारला माफ करणार नाही,” असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आमदार रोहित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो दोन महिन्यांपूर्वी आले आहेत. माणुसकी जपली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का? सरकार जपत आहात, मैत्री जपत आहात, राजकारण जपत आहेत पण माणुसकी जपत नाही ही बाब दुर्दैवी आहे. या सगळ्या प्रकरणात खोलात जाऊन शोध घेतला तर धनंजय मुंडेंनी कुणाची पाठराखण केली आहे हे समजू शकेल. जर मंत्रीच तो व्यक्ती असेल तर कुठला पोलीस काम करणार आहे?” असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.