
PM Modi Shrikant Shinde
Modi Cabinet : केंद्रातील मोदी मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 8 उमेदवारांची घोषणा केली. मात्र, या यादीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांची नावे नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दोन्ही नेत्यांचा राज्यसभा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जातं का, की मंत्रिमंडळातून त्यांची गच्छंती होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हरदीपसिंग पुरी हे मोदी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहेत. जानेवारी 2018 मध्ये त्यांची उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवड झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले. 2024 मध्ये त्यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.
Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
मात्र, आता उत्तर प्रदेशातील भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नसल्याने त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मंत्रिपद कायम ठेवण्यासाठी त्यांना संसदेच्या कोणत्यातरी सभागृहाचं सदस्यत्व आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना दुसऱ्या मार्गाने राज्यसभेवर पाठवलं जाणार का, याकडे लक्ष आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या केंद्रातील प्रतिनिधित्वाबाबतही राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडे लोकसभेत सध्या 13 खासदार आहेत. त्यामुळे केंद्रातील पक्षाचं प्रतिनिधित्व आणखी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
हरदीपसिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांच्या जागी भाजपकडूनच नवे चेहरे आणले जाणार की महायुतीतील घटक पक्षाला अधिक महत्त्व दिलं जाणार, हे आगामी निर्णयांमधून स्पष्ट होणार आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत आणखी काही नावे पुढे आली आहेत. उत्तर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले पंकज चौधरी आणि दिल्ली भाजप अध्यक्ष हर्ष मल्होत्रा हे दोघेही सध्या केंद्रीय मंत्रिपदावर आहेत. भाजपच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ या धोरणानुसार पक्ष संघटनेतील जबाबदारी आणि केंद्रीय मंत्रिपद यापैकी एका पदाचा त्याग करावा लागू शकतो, अशी चर्चा आहे.
याशिवाय पंजाबमधील रवनीतसिंग बिट्टू आणि केरळमधील जॉर्ज कुरियन यांच्या भूमिकेबाबतही राजकीय चर्चांना वेग आला आहे. एकूणच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या घडामोडींमुळे मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणाला संधी मिळणार आणि कोणाची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.