(Photo - Social Media)
जेन झी च्या मानसिकतेविषयी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, त्यांच्या पिढीतील लोक मोठ्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारत असत. मात्र आजची पिढी प्रत्येक प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर मागते. त्यांना केवळ आदेश नकोत, तर संवाद आणि आपुलकीही हवी असते. त्यामुळे नव्या पिढीशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलन म्हणजे देशद्रोह नव्हे. लोकशाहीमध्ये आंदोलन हा संवादाचाच एक भाग आहे. मात्र, आंदोलन संविधानाच्या चौकटीत आणि कायदेशीर पद्धतीने झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आंदोलन आणि लोकशाहीतील प्रक्रियांना योग्य दिशा दिली असून, त्याच चौकटीत राहून भूमिका मांडली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘एकनाथ शिंदेंबाबत गैरसमज करून घेऊ नका’; मनोज जरांगेंना उदय सामंतांचा फोन, चर्चेचं आश्वासन
जंतर-मंतरवरील लाठीमाराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भागवत यांनी सावध भूमिका घेतली. या घटनेची संपूर्ण माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी कोणावरही निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच, जेन झी ही पिढी अधिक प्रामाणिक असून देशभक्तीसाठी हा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना भागवत यांनी अनेक शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शिक्षण हा व्यवसाय नसून समाज आणि देशाचे भविष्य घडवण्याचे साधन आहे. त्यामुळे शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावे आणि त्यामध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, देशातील लाखो शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षणासाठी अधिक निधीची गरज आणि व्यवस्थेतील सुधारणांवरही त्यांनी मत व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) ६ टक्के निधीची मागणी योग्य असल्याचे सांगत त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता समाजानेही शिक्षणाच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षण व्यवस्था आणि समाजातील सकारात्मक बदल केवळ आंदोलनातूनच नव्हे, तर सातत्यपूर्ण संवाद, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नांमधूनही घडवून आणता येऊ शकतात, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.






