ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
Owaisi on Gadkari : देशातील राजकीय घडामोडीना सध्या वेग प्राप्त झाला असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोजच टीका – टिपण्ण्या, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक आणि आभार जाहीरपणे त्याचे कट्टर विरोधक मानले जाणारे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मानले आहेत.
रविवारी (20 सप्टेंबर) ओवैसी कानपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी बिहारमध्ये निवडून आलेल्या आपल्या पाच आमदारांची गडकरींसोबत झालेली भेट आणि त्यानंतर घडलेला किस्सा सांगितला. ओवैसींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.
ओवैसी म्हणाले की, “बिहारमध्ये एमआयएमचे पाच आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीत गडकरींनी आमदारांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. तब्बल 45 मिनिटे त्यांनी वेळ दिला. या भेटीत जुन्या पुलांचा प्रश्न, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधांबाबत आमदारांनी गडकरींना माहिती दिली. त्यानंतर आपण गडकरींना, सर, तुम्ही फोन करून काम सुरू करायला सांगा,” अशी विनंती केली. त्यावर गडकरींनी तात्काळ फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या,” असं ओवैसी म्हणाले.
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…
“मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,” असं गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचा किस्साही ओवैसींनी यावेळी सांगितला. त्यामुळे ओवैसींनी गडकरींचे जाहीर आभार मानले.
यानंतर ओवैसींनी थेट उत्तर प्रदेशच्या राजकारणावर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणूक आधीच्या निवडणुकांसारखी राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. 2014, 2017, 2019 आणि 2022 पेक्षा यावेळची निवडणूक वेगळी आणि आव्हानात्मक असेल, असं ते म्हणाले.
भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पार्टीच्या काळात यादव राजकारणाची चर्चा होत होती, तर आता ठाकूर वर्चस्वाची चर्चा होत असल्याचं ओवैसी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील विकास, वीज आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही ओवैसींनी सरकारला घेरलं. भाजपच्या सत्ताकाळात गरीबांच्या जमिनी बळकावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. “पूर्वी समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये वेगळ्या पद्धतीची गुंडगिरी होती, आता योगी सरकारमध्ये वेगळ्या प्रकारची गुंडगिरी आहे,” असा आरोप ओवैसींनी केला.
राम मंदिराशी संबंधित कथित हेराफेरीच्या एसआयटी रिपोर्टचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. हा रिपोर्ट सरकार जाहीर का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. संबंधित प्रकरणांतील आरोपींना जामीन कसा मिळतो, हाही आगामी निवडणुकीतील चर्चेचा मुद्दा असेल, असं ओवैसी म्हणाले.
दरम्यान, ओवैसींनी गडकरींचे जाहीर आभार मानणं आणि त्याचवेळी भाजपवर केलेली टीका, या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या वक्तव्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर






