'सरकारला सत्तेची मस्ती'; 'गोकुळ'वरून खासदार संजय राऊत आक्रमक
मुंबई : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, ते खोटारडे व्यक्तिमत्त्व आहे. मोदींनी सर्वांचीच चौकशी करायला हवी; मात्र ते सोयीस्कर चौकशी करतात. सुप्रिया सुळे यांचे नाव घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी कितीही राजकीय फासे टाकले, तरी शरद पवार त्यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. गोकुळ निवडणुकीवर ते म्हणाले, सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. बहुमत डावलून पराभूत झालेल्यांच्या हातात गोकुळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गोकुळ गुजरात लॉबीला विकण्याचा सरकारचा डाव आहे. यांना लोकशाहीची चाड नाही. लोकभावना दडपून स्वतःची सत्ता आणण्यासाठी चार संचालक नेमणे म्हणजे सत्तेची चरबी वाढल्याचे लक्षण आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले पॅनेल सरकारला चालत नाही का? बहुमताचा अनादर करून पराभूत झालेल्यांना सत्तेवर बसवण्यात आले आहे.
तसेच साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कौल मान्य नसेल, तर लोक रस्त्यावर उतरतील. गोकुळ वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र आले पाहिजे. फडणवीस सरकारला याची किंमत मोजावी लागेल. अमित शहांची झुंडशाही मोडून काढली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात साम्य
अमेरिकेतील निवडणुकीवर खासदार राऊत म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात साम्य आहे. ट्रम्प, मोदी आणि नेतान्याहू हे एक त्रिकूट आहे. अमेरिका युद्धात का उतरला, याचे उत्तर जनता शोधत आहे. अमेरिकेच्या जनतेने द्वेषाचे राजकारण नाकारले आहे. हा सर्वधर्मीयांचा विजय आहे. टोकाची धर्मांधता जनता स्वीकारत नाही.
FAQ
१. गोकुळच्या मुद्द्यावर कोण आक्रमक?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोकुळच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे.
२. संजय राऊत यांनी सरकारवर काय आरोप केला?
सरकारला सत्तेची मस्ती आली असून बहुमताचा अनादर करून पराभूत झालेल्यांच्या हातात गोकुळची सत्ता देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
३. गोकुळ कोणत्या कारणामुळे चर्चेत?
गोकुळच्या निवडणुकीनंतर संचालक नियुक्ती आणि सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.






