संजय राऊतांच्या 'बोध कीर्तन' पुस्तकाचे प्रकाशन (Photo - Social media)
मुंबई : शिवसेना खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांचा अंदाज काहीसा वेगळा पाहायला मिळाला. निमित्त होतं त्यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं! या कार्यक्रमात राऊतांनी साहित्य, अध्यात्म, तुरुंगातील अनुभव आणि राजकीय नेत्यांच्या भाषणांवर दिलखुलास भाष्य केलं. त्यांच्या काही विधानांनी उपस्थितांमध्ये हशाही पिकला. (Sanjay Raut)
राऊत लिखित ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात प्रत्येक पुस्तकाचा उत्सव व्हायला हवा. आपण खाद्यपदार्थांचे आणि कपड्यांचे उत्सव साजरे करतो, मग मराठी साहित्याचाही उत्सव का होऊ नये? मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात मराठी साहित्यावर चर्चा करण्यासाठी लोक एकत्र येतात, हे दाखवून देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या नावावरून काहींना संजय राऊत आध्यात्मिक कसे असू शकतात, असा प्रश्न पडू शकतो, असं म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. उत्तम वक्ता हा उत्तम कीर्तनकार असावा लागतो. वक्त्याकडे सांगण्यासारखं काही असेल, तरच त्याचं कीर्तन प्रभावी ठरतं, असं ते म्हणाले.
तुरुंगातील १०५ दिवसांच्या अनुभवाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यामुळे उत्तम साहित्य निर्माण होईल.” त्यांच्या या विधानाने कार्यक्रमात हशा पिकला. सावरकर, टिळक आणि इतर लेखकांच्या तुरुंगातील साहित्यनिर्मितीचाही त्यांनी उल्लेख केला.
राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी केलेल्या भाषणाचाही उल्लेख केला. तुरुंगात असताना हे भाषण ऐकून आपण लिहून काढल्याचं त्यांनी सांगितलं. टेलिप्रॉम्प्टरशिवाय केलेलं ते उत्स्फूर्त आणि अराजकीय भाषण आपल्याला आवडलं, त्यामुळे त्याचा पुस्तकात समावेश केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आपल्यालाही भावना आहेत, कविता आवडतात आणि साहित्यिकांशी संवाद साधायला आवडतं, असं राऊत म्हणाले. प्रसिद्ध कवी ग्रेस हे ‘सामना’ येथील त्यांच्या केबिनमध्ये तासन्तास बसायचे. अशा अनेक साहित्यिक मित्रांसोबत झालेल्या संवादातून ‘बोध कीर्तन’ आकाराला आल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकाशन सोहळ्यामुळे संजय राऊतांचा साहित्यिक आणि वैयक्तिक अनुभवांचा वेगळाच पैलू समोर आला.
Ans: संजय राऊत यांच्या पुस्तकाचे नाव 'बोध कीर्तन' असे आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
Ans: या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र उपस्थित होते.
Ans: तुरुंगात घालवलेल्या १०५ दिवसांचा उल्लेख करताना अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यामुळे उत्तम साहित्य निर्माण होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.






