mp sanjay raut press confernce live on sharad pawar mahayuti political news
Maharashtra politics: मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण तापले आहे. मुंबईमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप पक्षासह सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची देखील शक्यता आहे. महाविकास आघाडीसह मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांवर संशय घेतला आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “महायुतीला कोणी नेते आहेत का? महाराष्ट्रात महायुतीने मत चोरी, घोटाळा आणि पैशाचा वापर करून हा विजय प्राप्त केला आहे. नॅरेटिव्ह सेट करणे हा एक राजकीय भाग आहे. लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी त्या दृष्टीने आखणी, योजना, बांधणी करावी लागते. नॅरेटिव्ह फेक नसतो, जी योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपने केलं. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसच्या नेत्यांविषयी तयार केलेले फेक नॅरेटिव्ह हे भारतीय जनता पक्षाने केले,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमले आहे का? निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हातात हात घालून काम करतात; त्याच पार्टनरशिपमधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला स्पष्ट आहे. ऐरोली आणि बेलापूरमध्ये मिळून साधारण 70 हजार दुबार मतं आहेत. नाशिकमध्ये 3 लाख 53 हजार बोगस मतं आम्ही बाहेर काढली. पैठणमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार विलास भुमरे म्हणतात की, 20000 मतं बाहेरून आणली. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, तिथे 1 लाख बोगस आणि डुप्लिकेट मतं आहेत,” असा आरोप देखाल खासदार संजय राऊत यांनी केला.
लोक संकटकाळात मदतीसाठी पवारांकडेच येतात
त्याचबरोबर शरद पवार यांच्या वक्तव्यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राजकारणात एकमेकांवर टीका केली, तरीही संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जातो. शरद पवार यांनी यावरून अनेक वर्षांत घडलेल्या घटनांचा सारांश सांगितला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मदत करणारे दोन प्रमुख नेते हे शरद पवार आणि हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्या अनुभवाचा उपयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांनाही करून घ्यावा लागतो; ही एक परंपरा आहे. राजकारणात अनेकदा चिखलफेक करणारे लोक संकटकाळात मदतीसाठी पवारांकडेच येतात,” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी एका दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये ते मोदीभक्त असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यावरुन जोरदार चर्चा सुरु असताना खासदार राऊत यांनी महेश कोठारेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “महेश कोठारे नक्की मराठी आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. महेश कोठारे यांचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाही, तात्या विंचू मराठी माणूस होता, रात्री चावा घेईल आणि गळा दाबेल,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांची महेश कोठारेंवर टीका केली.