सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : परळी तालुक्यातील बोधेगाव येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भावनिक खंत व्यक्त केली. “ज्या घटनेशी आपला कोणताही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे”, असे माजी मंत्री तसेच आमदार धनंजय मुंडे म्हणाले होते. धनंज मुंडे यांच्या विधानावरुन करुणा मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, तू गुन्हा केला नसला तरी जे लोक गुन्हा करत होते, त्यांना पाठबळ देणारं तुझं मंत्रीपद होतं. तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर वाल्मीक कराड सारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहेत अशा शब्दांत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. वाल्मीक कराड कोणासाठी काम करत होता? तुझ्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये तो होता, जे बिझनेस आहेत, त्या सगळीकडे तो होता. एक घरामध्ये काम करणारा साधारण गुंड हा साधारण नव्हे तर तुझीच सावली होता तो. त्यांना मोठं करणारं तुझं मंत्रीपद होतं. बीडमध्ये आणि परळी मध्ये अजूनही खंडणी गोळा करणे, जमीन हिसकावणे, कला केंद्र, नकली दारू असे सगळे धंदे तुझे कार्यकर्ते करत आहेत. घरात काम करणाऱ्या वाल्मीक कराडची काय लायकी होती? असा सवाल करूणा मुंडे यांनी विचारला.
आज परळीची अवस्था काय आहे ते मी पाहिलं आहे. जे गुंड झाले त्यांचा दोष नाही त्यांची काय लायकी होती? त्यांची काहीच लायकी नव्हती. वाल्मीक सारख्या लोकांना हाताखाली धरून गुंडांची गँग तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात धनंजय मुंडे तुझा होता असा आरोपही करुणा मुंडे केला. व्हाईट कॉलर बनून मोठं भाषण देत आहेस, पण असं चालू देणार नाही , आता मी आहे असा इशाराही करूणा यांनी दिला.
संतोष देशमुख प्रकरणावरुन गंभीर आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तुझा हात नसेल. तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास, तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर हे लोकं काम करत होते. आज परळी मध्ये नकली दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत. आणि तू काय म्हणतोस की, माझी चूक नाही, सगळ्यात मोठी चूक तर तुझीच आहे, असा घणाघाती आरोप करुणा यांनी केला