mp sanjay raut target eknath shinde mahayuti over maratha reservation news
Maratha Reservation : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरु केले असून हजारो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला ठाकरे गटाने पाठिंबा देत महायुती सरकारवर निशाणा साधला. तर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई हारणाऱ्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वाद-विवाद सुरु झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना मराठा बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख ऐकण्याचा वेळ नव्हता, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरुन खासदार राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले की, “गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत आणि त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊनही जरांगे पाटील यांना भेटले नाहीत, ही बाब अत्यंत निराशाजनक आहे. जे गृहमंत्री कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, ते मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करू शकत नाहीत? त्यांना मराठा समाजाला न्याय देण्याचं श्रेय घेता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही,” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीकास्त्र डागले आहे. ते म्हणाले की, “शिंदे शेपटी हलवत अमित शहांच्या मागे फिरतात. मराठा समाजाचा इतका गंभीर प्रश्न सुरू असताना, ते दरे गावात जाऊन यज्ञ करायला बसले आहेत. तुम्ही कसले मराठा? शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका. फडणवीस हे कसले मराठे? हे लोक मराठी माणसासाठी कलंक आहेत. त्यांना मराठा लोकांची काळजी नाही, उलट मराठी माणसाला संपवण्यासाठीच त्यांचे सरकार इथे आले आहे,’ अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केली आहे.