दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणावर सुनील तटकरेंचं मोठं विधान; म्हणाले, 'याबाबतचा तसा प्रस्ताव...'
कराड : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रिकरणाच्या चर्चा आहेत. मात्र, याबाबत कुठेही तसा अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिवादन केले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवाजीराव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. तटकरे म्हणाले, ‘दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर बहुजन समाजाचे हित असेल तर, तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे. आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी झालो’.
तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांपासून आम्ही तसूभरही बाजूला गेलो नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांपासूनही आम्ही बाजूला गेलो नाही. या भूमिकांवर आम्ही ठाम असून, भविष्यातही ठाम राहणार आहोत. आमच्या निर्णयावर राज्यातील बारा कोटी जनतेने शिक्कामोर्तब केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये इन्कमिंग सुरु
महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये इन्कमिंग सुरु आहे. त्यामुळे आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची ही तयारी आहे का? यावर तटकरे म्हणाले, आम्ही एनडीए म्हणून एकत्रित आहोत. पंडित नेहरूनंतर नरेंद्र मोदींना सलग तीनवेळा पंतप्रधानपद भूषवण्याची संधी 130 कोटी जनतेने त्यांना दिली. मुख्य भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिन्ही एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणे हा विचारही कधी कोणाच्या मनात येऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एकत्रितपणे कसे सामोरे जाता येईल, यावर तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्रित बसून चर्चा करतील.
गुन्हेगारी घटनांबाबत मुख्यमंत्री लक्ष ठेऊन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारले तरीही, तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मिटलेला नाही? या प्रश्नावर तटकरे म्हणाले, अजितदादांनी पालकमंत्रिपद स्वीकारल्यावर त्यांनी संपूर्ण बीडचा दौरा केला. रेल्वे, रस्ते, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज असे अन्य विविध प्रश्न त्यांनी तत्परकेने हाती घेतले आहेत. काही घटना घडल्यावर त्याचे परिणाम संपूर्ण राज्यभर उमटत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे.