
"सत्ताधारी पक्षाच्या महिला देखील..."; चिंचवडमधील 'त्या' प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची टीका
राज्यातील कायदा-सुव्यवस्था अतिशय गंभीर
सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यालाच पोलीस ठाण्यात मारहाण
पिंपरी चिंचवड मध्ये गुंडाराज चालू आहे का?- सुळे यांचा सवाल
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यालाच पोलीस ठाण्यात मारहाण झाली, तरी तक्रार नोंदवण्यास ८-९ तास लावले. ही यंत्रणा नेत्यांना वाचवते, महिलांना न्याय देत नाही. सत्ताधारी पक्षाच्या महिलाही सुरक्षित नसतील, तर सामान्य महिलेचे काय होणार? राज्यातील कायदा-सुव्यवस्था अतिशय गंभीर आहे,” अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून केली.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग केले. या घटनेत भाजपच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांना पक्षाच्याच नेते अनुप मोरे यांच्या सात समर्थकांनी त्यात दोन महिलांनी घरी धमकावले, गाडी फोडली आणि चिंचवड पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारहाण केली. तरी देखील पोलीस तक्रार नोंद करत नसतील तर पिंपरी चिंचवड मध्ये गुंडाराज चालू आहे का? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे यांचे ट्वीट काय?
पिंपरी-चिंचवड परिसरात एका महिलेला सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण झालेली महिला देखील त्याच पक्षाची पदाधिकारी आहे. सदर घटना समोर घडली होती तरी देखील तिची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीसांनी ८ ते ९ तास घेतले.
यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित गुन्ह्यात कशा पद्धतीने वागते आणि महिलांना कशा पद्धतीने वागणूक देते याची ही घटना मूर्तीमंत उदाहरण आहे. जर या राज्यात सत्ताधारी पक्षाच्या महिला देखील सुरक्षित नसतील आणि त्यांना न्याय मिळविण्यासाठी झगडावे लागत असेल तर राज्यातील कायदा सुव्यवस्था अतिशय गंभीर आहे असे स्पष्ट दिसते.