'दिल्लीतही जाऊ देत नाहीत अनं इथेही राहू दिलं जात नाही'; भुजबळांची घुसमट नक्की कोणामुळे?
नाशिक : राजकीय वर्तुळामध्ये सध्या नाराजीनाट्य सुरु आहे. महायुतीचे नेते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे नाराज आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदावरुन कुरबुर सुरु आहे. महायुतीमध्ये छगन भुजबळ, तानाजी सावंत, सुधीर मुनगंटीवार असे अनेक नेते नाराज आहेत. यानंतर आता छगन भुजबळ यांनी आपली मोट पुन्हा एकदा बांधण्यास सुरुवात केली आहे. भुजबळ यांनी नाशिकमध्ये मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे.
जो न्याय त्याला दिला मला का नाही
छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मेळावा घेतला आहे. या मेळाव्यामधून त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणाले की, “राज्यसभेवेळी मला सांगितलं सुनेत्रा ताई पडल्या. आपल्याला त्यांचा विचार करावा लागला. मी म्हटलं ठीक आहे. दुसरी राज्यसभा आली. सातारची जागा आपल्याला मिळाली. पण भाजपला उदयनराजेंसाठी हवी होती. साताऱ्यासाठी नितीन पाटील इच्छुक होते. अजितदादांनी मान्य केलं. नितीन पाटीलला सांगितलं तुम्ही माघार घ्या. मी तुम्हाला खासदार करेन. परत नितीन पाटील यांचं नाव आलं. खासदारकीची पोस्ट देताना चर्चा केली होती. मलाही शब्द दिला होता ना. जो न्याय त्याला दिला मला का नाही दिला. घर की मूर्गी दाल बराबर का ? मला म्हणाले, तुमची गरज राज्यात आहे. त्यामुळे तुम्हाला लढावं लागेल. कारण लोकसभेत उलटे सुलटे निकाल आले होते. मला विधानसभेचं तिकीट दिलं. मी लढलो,”असा सगळा घटनाक्रम छगन भुजबळांनी स्पष्ट करुन सांगितला.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही
“आता नितीन पाटीलला राजीनामा द्यायला सांगतो. तो खाली येईल. त्या जागेवर तुम्ही जा. मला म्हणतात तुम्हाला जायचं होतं ना? म्हटलं आता. मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभं करायचंच नव्हतं. मला निवडणुकीला उभं केलं. ज्यांनी जिवाचं रान करून माझ्यासाठी लढले ते डोकी फोडून घेतील ना. त्यांना काय सांगायचं? मतदारांना काय सांगायचं? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अनेक प्रयत्न केले. फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं भुजबळांना घ्या. असं करू नका सांगितलं. ठिक आहे. आता जे झालं ते झालं. कोणी केलं काय केलं, उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही,” असे म्हणत छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मराठा आरक्षणाला विरोध नाही
पुढे आरक्षणाबाबत देखील भुजबळ यांनी वक्तव्य केले. भुजबळ म्हणाले की, “१० टक्के आरक्षण दिल्यानंतर देशभरातल्या इतर राज्यांमधली आंदोलनं शमली होती. मात्र मराठा समाज हा EWS मध्ये साडेआठ टक्के आहे. त्यामुळे त्यांचं नुकसान होतं आहे. हे माझं म्हणणं नाही हे त्यांचंच म्हणणं आहे. मी मार्ग काढायला तयार आहे, तुमच्याशी चर्चा करायला नाही. आपण कुणीही मराठा विरोधी नाही. आमच्यावर कुरघोडी करण्याचा जे कुणी प्रयत्न करत आहेत त्यांना विरोध करणं हे तुमचं आणि माझं काम असणार आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या. अशी मागणी आम्ही आधीपासून करत होतो,” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.