File Photo : Chhagan Bhujbal
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. सत्तास्थापना आणि मंत्रीमंडळ विस्तार यावरुन महायुतीमध्येच नाराजीचा महापूर आलेला आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. या विस्तारामध्ये काही अनुभवी जेष्ठ नेत्यांची संधी नाकारण्यात आली. यामुळे तिन्ही घटक पक्षांचे नेते नाराज आहेत. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन मात्र महायुतीच्या नेत्यानेच त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
छगन भुजबळ यांना महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रीमंडळामध्ये सामील करुन घेण्यात आलेल नाही. यावरुन त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या नाराजीवर शिंदे गटाचे नाशिकचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी जहरी टीका केली आहे. सुहास कांदे यांनी हे छगन भुजबळ यांना त्यांच्या गद्दारीचे फळ मिळाले असल्याचे म्हटले आहे. यावरुन आता छगन भुजबळ यांना महायुतीमधून घरचा आहेर मिळाला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे म्हणाले की, “महायुतीत कोणीच नाराज नाहीत, एकटे छगन भुजबळ नाराज आहेत. छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं म्हणजे सर्व OBC ना दिलं असा त्यांचा समज आहे. पण मंत्रिमंडळ पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की OBC ना न्याय दिला आहे. मला असं वाटतं की एकट्या भुजबळांना दिलं म्हणजे OBC ना दिलं हा गैरसमज आहे. लोकसभेत त्यांनी केलेली गद्दारी आणि विधानसभेला त्यांच्या पुतण्याने केलेली गद्दारी याचं हे फळ आहे.” अशी गंभीर टीका सुहास कांदे यांनी केली आहे.
सुहास कांदे पुढे म्हणाले की, “मी जाती-पाती-धर्म-पंथावर बोलणार नाही. पण आंदोलन करणारी विशिष्ट जात आहे. ते लोकच आंदलन करतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे जनतेला दाखवत आहेत, त्याचा महाराष्ट्रातील जनतेवर फरक पडणार नाही. त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला महायुतीच्याविरोधात काम केलं होतं. त्याचं त्यांना फळ मिळालं आहे. तसंच, त्यांचं वयही झालंय. मी महायुतीतील तिन्ही नेत्यांचे आभार मानेन. कारण तिघांनीही OBC ना संधी दिली. ते खरंच ओरिजनल भुजबळ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा”, असा घणाघात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नाराज नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये भुजबळ यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या भाजप पक्षश्रेष्ठींसोबतच्या अनेक चर्चा देखील उघड केल्या. तसेच छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका एवढाच आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.