पूर्णेकर हत्या प्रकरणात सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप
Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. आता सुषमा अंधारे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, पूर्णेकर कुटुंबीयांसोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही व्यक्तींवर कारवाई झालेली नाही, असा दावा त्यांनी केला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे यांच्या दाव्यानुसार, प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने पहिल्याच दिवशी दिलेल्या जबाबात मीनाक्षी शिंदे यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे या दिशेने पोलिसांनी तपास केला आहे का, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. पूर्णेकर यांनी क्लस्टरच्या मुद्द्यावरून तसेच कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला होता, असंही अंधारेंनी म्हटलं. मीनाक्षी शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावरही पूर्णेकर यांनी आक्षेप घेतल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिपचा मुद्दाही अंधारेंनी उपस्थित केला. मीनाक्षी शिंदे यांनी हा ऑडिओ AI-निर्मित असल्याचं म्हटलं असल्याचा उल्लेख करत, जर ऑडिओ बनावट असेल तर त्याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.
तसंच मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे आणि ‘टल्ल्या’ यांची पवारनगर येथे भेट झाल्याचा दावा करत पोलिसांनी या संदर्भात माहिती तपासावी, अशी मागणी अंधारेंनी केली.
पूर्णेकर हत्या प्रकरणात पाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. याशिवाय हत्या होण्याच्या आधी सुमारे 15 दिवसांपासून रेकी सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला. हॉटेल महाराजाचे CCTV फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणीही अंधारेंनी केली.






