:प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत म्हणाले की, या हत्येसाठी सर्वस्वी ठाणे पोलीस जबाबदार आहेत. ठाणे पोलीस हे या प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचे आरोपी आहेत. पोलीस आयुक्त पालकमंत्र्यांचे नोकर आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गणेश नाईकांना आवाहन आहे, ठाण्यात जा, पूर्णेकरांच्या घरी जा आणि ठाण्याचे नेतृत्व करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी आणि आदित्य ठाकरे गेलो नसतो, तर मुख्य आरोपींची नावे समोर आलीच नसती.” असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात आहे, कारण ही राजकीय हत्या आहे. लेडी डॉन आणि तिच्या पतीची सर्वप्रथम पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, जशी रमेश म्हात्रे यांची करण्यात आली. अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. शिंदे मिनाक्षी शिंदे यांच्या पाठिशी का उभे आहेत? असाही खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, शिंदेंनी नैतिकता दाखवली पाहिजे, तिची क्लिप ऐकल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिला तात्काळ पक्षातून काढून टाकले असते. असंही त्यांनी नमुद केलं.
बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावतात, त्यांचे नाव घेतात आणि स्वतःला त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणवतात. मात्र आमचा पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. तुम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार कसे? या हत्येमुळे एका कुटुंबाला रस्त्यावर आणले आहे. त्यांचा राग व्यक्त करा, शिवी घाला, जशी मी घालतो. हा खून पचणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” दिल्लीत आंदोलन होत आहे आणि मुंबईतही CJPचे मुख्य आंदोलन होत आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आदित्य ठाकरे आणि माझी कन्याही CJPच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. अटक झाली तरी आम्ही तयार आहोत.
लग्नासाठी, डीजेसाठी परवानगी मागितली जाते तशी सीजेपीच्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली, मग फडणवीसांना याचा राग का फडणवीसांनी या आंदोलनालाही परवानगी द्यायला पाहिजे होती. पण तरीही सीजेपीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तरीही हे कॉकरोचेस यशस्वी होणार आणि ज्ञानेश कुमारांनाही जावे लागणार, असही त्यांनी म्हटलं आहे.
येत्या ४ तारखेलाही इंडिया आघाडीचे मोठे आंदोलन होत आहे. त्याला परवानगी दिली जाते, मग CJPच्या आंदोलनाला परवानगी का नाही?राज्यात हिटलर आणि मुसोलिनीचे राज्य का? इंग्रजांनीही अशा अटी लादल्या नव्हत्या. न्यायालये गुलाम झाली आहेत आणि संघाचे लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत.” अशी टिकाही संजय राऊतांनी यावेळी केली.






