Prashant Kishore meets Sunetra Pawar and Parth Pawar
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे राजकीय सल्लागार होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीत आगामी निवडणुका, पक्षाची संघटनात्मक रणनीती आणि जनमत चाचण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलीकडील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनातही प्रशांत किशोर यांचे मार्गदर्शन घेतल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांवरून अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी फेब्रुवारी 2026 मधील अध्यक्षपदाची निवड पक्षघटनेनुसार झालेली नसल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले होते. या घडामोडींमुळे पक्षाच्या अंतर्गत कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘सरकारचा हस्तक्षेप नाही’; मनोज जरांगे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
याशिवाय, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नसल्यामुळे दोन्ही वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशा परिस्थितीत पक्षाची प्रतिमा जनतेसमोर सकारात्मक ठेवण्यासाठी नव्या रणनीतीवर भर दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
याआधी मे 2026 मध्येही प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्या वेळी पार्थ पवार यांनी स्वतः सोशल मीडियावर भेटीचे छायाचित्र शेअर केले होते. मात्र, प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीत यापूर्वी डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा महत्त्वाची भूमिका बजावत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची प्रचार मोहीम, गुलाबी थीम आणि प्रचार आराखडा त्यांनीच तयार केला होता. मात्र, त्यानंतर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांसोबत मतभेद झाल्याच्या चर्चा समोर आल्या आणि मार्च 2026 मध्ये त्यांच्या कंपनीचा करार संपुष्टात आल्याचे वृत्त आले.
Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
प्रशांत किशोर हे देशातील आघाडीचे राजकीय रणनीतीकार मानले जातात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, एम. के. स्टॅलिन, जगनमोहन रेड्डी आणि इतर अनेक नेत्यांसाठी निवडणूक रणनीती आखली आहे. अलीकडेच बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवत त्यांनी सक्रिय राजकारणातही प्रवेश केला आहे.






