Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut PC Delhi: शिवसेना पक्ष फुटलेला नाही. विधीमंडळ पक्षात फूट पडली पण शिवसेना फुटलेली नाही, पक्ष आणि चिन्ह उद्धव शिवसेनेकडे राहायला हवी. काही लोक अमित शाहांपोटी, काहीजण लोभापोटी फुटले. पण मुळ पक्ष आणि आणि चिन्ह हे शिवसेनेकडेच राहायला हवं ,अशा प्रकारची भूमिका आमच्या वकीलांनी मांडली.” अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “हा एक ऐतिहासिक खटला देशाच्या लोकशाही संदर्भात सुरू आहे. याची जाणीव सर्वोच्च न्यायालयाला आहे. देशातील भविष्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे, हे सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे.”
विधीमंडळातील आमदाराचा गट फुटला म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही. हे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी स्वतः दिवसभर न्यायालयात उपस्थित होतो आणि न्यायालयाच्या मनातील शंका दूर करण्याचे काम आमच्या वकिलांनी प्रभावीपणे केले. मीही न्यायालयात होतो. न्यायालयाच्या अनेक शंकांचे निरसन कपिल सिब्बल यांच्याकडून न्यायालयाने करुन घेतलं. असंही संजय राऊतांनी सांगितलं.
ते म्हणाले, “एका चिन्हावर निवडून आलेले लोक कोणत्याही कायद्याचे, संविधाने बंधन न पाळता दुसऱ्या पक्षांत जाऊन सत्तेत घुसू लागले, तर या देशातील लोकशाहीआणि संविधानाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे न्यायालयाने आता यांच्यावर कायद्याचे बंधन टाकायला पाहिजे.
समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आहे. भाजपमध्ये विलीन व्हायचं, याच्या हालचाली सुरू आहेत. आता लवकरच फुटीर गटाचे लोक दिल्लीला येतील, त्यांच्याशी चर्चा करतील. भाजपमध्ये विलीनीकरण करायचे की अन्य एखाद्या छोट्या पक्षात जाण्याचा पर्याय स्वीकारायचा, याबाबत त्यांच्या स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती मला मिळाली आहे,” असा दावा त्यांनी केला.
“२०१४ आणि २०१९ ला वैचारिक मतभेद कुठे होते?”
राऊत यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या. त्यावेळच्या निवडणुकांमध्ये हा फुटीर गट यांच्यासोबत सामील होता. त्यावेळी त्यांचे कथित वैचारिक मतभेद कुठे होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयालाही या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले असून, कपिल सिब्बल यांना तब्बल अडीच तास युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणाचा निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, संघ परिवारातील नेत्यांचीही मुले आणि नातवंडे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला हवा होता. “काल एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
अमृता फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “आम्ही बोलतो म्हणून लोकशाही जिवंत आहे. आम्ही आवाज उठवतो म्हणून देश जागा आहे. आम्ही गप्प बसलो असतो तर देश हुकूमशाहीकडे गेला असता. आम्ही त्याला विरोध करत आहोत आणि पुढेही करत राहू.”






