
Harshvardhan Sapkal on Rahul gandhi detain
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस आणि INDIA आघाडीचा आक्रमक पवित्रा कायम आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी काँग्रेस खासदार आणि INDIA आघाडीचे जवळपास 200 खासदार निघाले होते. मात्र, जंतरमंतरपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांच्या बस अडवल्या.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. राहुल गांधी आंदोलनासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर राहुल गांधींनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. प्रियंका गांधी यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत रस्त्यावर ठिय्या दिला. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. ‘याद रखना, हिसाब होगा..!’ असं ट्वीट करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.
‘INDIA आघाडी जंतर-मंतरवर, वोट चोर ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल,’ अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली. देशात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. संघर्ष आता आणखी तीव्र होणार असल्याचा इशाराही सपकाळ यांनी दिला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी INDIA आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर तीन बसमधून हे खासदार जंतरमंतरकडे निघाले.
मात्र, जंतरमंतर मैदानापासून जवळपास 100 मीटर अंतरावरच पोलिसांनी या बस अडवल्या. त्यानंतर राहुल गांधींना आंदोलन करण्यापासून रोखण्यात आलं. पोलिसांनी आपल्यासह इतर खासदारांना मारहाण केल्याचा आरोपही राहुल गांधी आणि इतर नेत्यांकडून करण्यात आला.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता आणखी तापण्याची शक्यता आहे. कालही राहुल गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे काँग्रेस आणि सरकारमधील हा संघर्ष पुढच्या काही दिवसांत आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.